न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना
टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पतकरला. त्यांचे लक्ष्य भारतातील तरुणांसाठी शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे होते.
आर्यभूषण छापखाण्याची स्थापना
त्यानंतर चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी १८८१ मध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी (मराठी) व मराठा (इंग्रजी) ही दोन वृत्तपत्रे सुरू केली.
प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठ्यांचे संपादक होते. वृत्तपत्रांच्या द्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य येथूनच सुरू झाले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना आणि टिळक-आगरकर मैत्री व वाद
टिळक आणि आगरकरांनी आपल्या सहकार्याच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
टिळक गणित व संस्कृत विषय शिकवीत. पुढे टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले.
आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला.
याशिवाय दुसरा वाद ‘आधी कोण? राजकीय की सामाजिक?’ या विषयावर झाला होता.जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत.
परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते.
टिळकांचे म्हणणे असे होते की, ‘आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये.
मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही ’.
डेक्कन एज्युकेशन संस्था सोडल्यानंतर १८९०–९७ या प्रारंभीच्या काळात टिळकांनी केलेले कार्य त्रिविध स्वरूपाचे होते.
या काळात पुढील प्रकरणे उद्भवली : (१) संमतिवयाचा कायदा, (२) ग्रामण्य प्रकरण, (३) रमाबाईंचे शारदासदन, (४) हिंदुमुसलमानांचे दंगे, (५) सार्वजनिक समाजकार्य इत्यादी.
या सर्व प्रकरणांत त्यांची भूमिका राजकारणी पुरुषाची होती आणि स्वराज्य हा त्यांचा प्रधान हेतू होता.
याकरिता ब्रिटिश सरकारच्या राज्यकारभारातील दोष व अन्याय यांवर वृत्तपत्रांतून उघड टीका करून त्यांनी कायद्याची मर्यादा प्रथम सांभाळली.
ब्रिटिश सत्ता हा ईश्वरी अंश आहे व उदारमतवादी इंग्रज हळूहळू भारताचे राजकीय हक्क मान्य करतील, त्यांच्या सदिच्छेवर अवलंबून राहणे, हीच उत्तम नीती होय ही नेमस्त भूमिका सोडून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीनच’, या भूमिकेपर्यंत लोकांना नेण्याचे कार्य, हा लोकमान्य यांचा संकल्प होता.
केसरी व मराठ्यातील तेजस्वी लेखांनी तसेच प्रसंगोपात्त प्रखर भाषणांनी लोकजागृतीचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले.
संमतिवयाचा कायदा
संमतिवयाच्या कायद्यावरून भारतभर जी धामधूम माजली, तिच्यात कायदाविरोधी पक्षाचे अग्रेसरत्व टिळकांकडे आले.
१६ वर्षांच्या आत मुलींची व २० वर्षांच्या आत मुलांची लग्ने करू नयेत, कोणी कोणास हुंडा देऊ नये, विधवांचे वपन करू नये अशी मौलिक सुधारणांची वाच्यताही झाली होती.
ग्रामण्य प्रकरण
पुण्यातील पंचहौद मिशनच्या चालकांनी १८९० मध्ये शहरातील काही प्रतिष्ठितांना व्याख्यानाच्या निमित्ताने पाचारण केले. त्या सर्व गृहस्थांसाठी चहा-बिस्किटांचा पाहुणचार ठेवण्यात आला होता.
हा सर्व समारंभ गोपाळराव जोशी यांनी घडवून आणला व पुणे वैभव या पत्रात यासंबंधीची सविस्तर हकीकत प्रसिद्ध केली.
काहींनी अब्रुनुकसानीचा दावा पुणे वैभववर लावला. टिळकांनी तेथे चहा घेतला असल्यामुळे, पुढे प्रायश्चित्ताचा विषय निघाला.
या सर्व पाप्यांना शिक्षा कुणी द्यावयाची, हा प्रश्न उपस्थित होऊन शंकराचार्यांकडे वादी या नात्याने काहींनी फिर्याद केली.
अनेक कारणांवरून बाकीचे सुटले. टिळकांनी काशीक्षेत्रात सर्व प्रायश्चित्त केल्याचा दाखला दाखविला यामुळे ते त्या प्रकरणातून मुक्त झाले.