शिक्षण दीक्षा ते आयसीएस पर्यंतचा प्रवास
कटकमधील प्रोटेस्टंट स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर १९०९ मध्ये ते रेवेन्शा कॉलेजिएट स्कूलमध्ये दाखल झाले. सुभाषच्या मनावर कॉलेजचे प्राचार्य बेनिमाधव दास यांचा चांगला प्रभाव होता.
वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी सुभाष यांनी विवेकानंद साहित्याचा पूर्ण अभ्यास केला होता. १९१५ मध्ये ते आजारी असूनही दुसऱ्या श्रेणीत इंटरमीडिएटची परीक्षा उत्तीर्ण झाले.
१९१९ मध्ये प्रथम श्रेणीत बीए परीक्षा उत्तीर्ण झाले. कलकत्ता युनिव्हर्सिटीमध्ये ते दुसर्या क्रमांकावर होते.
वडिलांची इच्छा होती की सुभाष आयसीएस झाला पाहिजे, परंतु त्यांचे वय झाल्या मुले ते फक्त एकदाच ती परीक्षा देऊ शकत होते.
शेवटी, त्याने परीक्षा देण्याचे ठरविले आणि १५ सप्टेंबर १९१९ रोजी इंग्लंडला गेले. लंडनच्या कोणत्याही शाळेत परीक्षेच्या तयारीसाठी प्रवेश मिळू शकला नव्हता, तर सुभाषने किट्स विल्यम हॉलमध्ये मानसिक व नैतिक शास्त्रांच्या ट्रायपास परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळविला.
यामुळे त्यांचे राहणे व खाणे यांचा प्रश्न सुटला. त्या ठिकाणी प्रवेश घेणे हा एक बहाणा होता, खरं तर आयसीएसमध्ये उत्तीर्ण होणे हाच त्यांचा उद्देश होता. म्हणून ते १९२० मध्ये पहिल्या यादीत चौथ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले.
स्वातंत्र्यलढ्यात प्रवेश व कार्य
कोलकाता येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी असलेले देशबंधू चितरंजन दास यांच्या कार्यामुळे प्रभावित झालेल्या सुभाष यांना दासबाबूंबरोबर काम करायचे होते. इंग्लंडहून त्यांनी दासबाबूंना पत्र लिहून त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
रवींद्रनाथ ठाकूर यांच्या सल्ल्यानुसार भारतात परतल्यानंतर ते प्रथमच मुंबईत गेले आणि महात्मा गांधींना भेटले. त्यावेळेस गांधीजी मुंबईत मणिभवन नावाच्या मठात राहत होते.
तेथे महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस २० जुलै १९२१ रोजी प्रथमच एकमेकांना भेटले.
१९२२ साली दासबाबूंनी काँग्रेस अंतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली. विधानसभेच्या आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, कोलकाता महापालिकेची निवडणूक, स्वराज पक्षाने लढवून, जिंकली. स्वतः दासबाबू कोलकात्त्याचे महापौर झाले.
त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली.
कोलकात्त्यातील रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना भारतीय नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमवेत सुभाषबाबूंनी कॉंग्रेसच्या अंतर्गत स्वातंत्र्य लीगची स्थापना केली. १९२८ मध्ये सायमन कमिशन जेव्हा भारतात आले तेव्हा कॉंग्रेसने त्यांना काळे झेंडे दाखवले.
सुभाष बाबूंनी कोलकाता येथे या चळवळीचे नेतृत्व केले.
१९२८ साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली कोलकात्त्यात झाले. ह्या अधिवेशनात सुभाषबाबूंनी खाकी गणवेश घालून, पंडित मोतीलाल नेहरूंना लष्करी पद्धतीने सलामी दिली.
१९३० साली काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली लाहोरला झाले, तेव्हा असे ठरवले गेले की जानेवारी २६ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून पाळला जाईल.
जानेवारी २६, १९३१ च्या दिवशी, कोलकात्त्यात सुभाषबाबू तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले.
सुभाषबाबू तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह केला व सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली.
परंतु सरदार भगतसिंग आदि क्रांतिकारकांची सुटका करण्यास इंग्रज सरकारने नकार दिला. भगतसिंगांची फाशी रद्ध करावी ही मागणी गांधींजीनी इंग्रज सरकारकडे केली.
सुभाषबाबूंची इच्छा होती, की ह्याबाबतीत इंग्रज सरकार जर दाद देत नसेल, तर गांधींजीनी सरकारबरोबर केलेला करार मोडावा.
पण आपल्या बाजूने दिलेला शब्द मोडणे गांधींजीना मान्य नव्हते. इंग्रज सरकारने आपली भूमिका सोडली नाही व भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना फाशी देण्यात आले. भगतसिंगांना वाचवू न शकल्यामुळे सुभाषबाबू, गांधींजी व काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर फार नाराज झाले.
कारावास
आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.
गोपीनाथ यांनी कोलकात्याच्या पोलीस निरीक्षक चार्लस टेगार्ट याला मारण्याचा प्रयत्न केला, पण चुकून त्यांच्याकडून अर्नेस्ट डे नावाच्या व्यक्तीचा खून झाला. त्यामुळे गोपीनाथ यांना फाशीची शिक्षा सुनावली. गोपीनाथ फाशीवर गेल्यामुळे सुभाष यांना खूप वाईट वाटले.
त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने असा अर्थ लावला कि, सुभाषबाबू यांचा क्रांतिकारकांशी संबंध आहे, त्यामुळे इंग्रजांनी सुभाषबाबूंना अटक केले.
त्यांच्यावर कोणताच खटला न चालवता त्यांना, म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.
हरीपुरा काँग्रेसचे अध्यक्षपद
काँग्रेसचे ५१ वे अधिवेशन हरिपुरा येथे झाले. १९३८ साली गांधीजींनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून सुभाषबाबूंची निवड केली.